PM Awas Yojana : नांदेड: प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर केली गेली आहेत. तथापि, जागेच्या अभावामुळे घरकुलांच्या बांधकामामध्ये विलंब होतो आहे. या समस्येवर उपाय म्हणून लाभार्थ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य आणि ग्रामीण आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केली जातात. मात्र, काही लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे घरकुल बांधता येत नव्हते. ही अडचण लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना बैठकीत बोलावून सध्याची परिस्थिती तपासली. यावेळी अनेक लाभार्थ्यांकडे जागेअभावी घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही, हे समोर आले.
महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966 अंतर्गत परवानगी
महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966 च्या कलम 41 नुसार, लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीवर 500 स्क्वेअर फूट क्षेत्रावर घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जागेअभावी घरकुलाची आशा ठेवून असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.